उजनीची पाणी पातळी खालावली   

सोलापूर, (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्‍या उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.  भीमा- सीना जोड कालव्यात पाणी सोडण्याची प्रक्रिया तूर्तास सुरू असली तरी, अन्य योजनांचे पाणी बंद करण्यात आले आहे.२०२४ मध्ये भीमा खोर्‍यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे उजनी धरण १११ टक्के भरले होते. याच काळात लाभक्षेत्रातही चांगला पाऊस झाला. त्यामुळे, पाण्याची मागणी नव्हती. 
 
मागील काही महिन्यांपासून सलग पाणी सोडले जात असल्यामुळे उजनी धरण एप्रिल महिन्यात वजा पातळीत पोहोचले. मागील वर्षी उजनीचा मृत साठ्यातील प्रवास हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला होता. त्यामानाने यंदा उजनीची स्थिती चांगली मानली जात आहे. सध्या उजनीमधून सिंचनासाठी कालव्यात पाणी सोडणे सुरू आहे. मार्च महिन्यात सोडण्यात आलेले पाणी सध्याही सलग सुरू ठेवण्यात आले आहे. मुख्य कालव्यात २,९५० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. याचा फायदा कालव्यालगतच्या शेतीला होत आहे. 
 
याचबरोबर भीमा-सीना जोड कालवाही सुरू ठेवण्यात आला असला तरी याचा विसर्ग कमी होऊन तो ४१० क्युसेक वेग इतका राहिला आहे. सीना, माढा, दहिगाव योजना बंद करण्यात आल्या आहेत. याचबरोबर भीमा नदीतील पाणी सोडणे आता थांबविण्यात आले आहे.८ एप्रिलपासून भीमा नदीत पाणी सोडले जात होते. यामुळे उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. यामुळे जलाशय काठावरील शेतकरी चिंतातूर आहे. 
 
सध्या उजनी धरणात ५७. १३ टीएमसी पाणीसाठा असून तो मृत पातळीत आहे. धरणाच्या मृत साठ्यातील ६. ५२ टीएमसी पाण्याचा वापर आतापर्यंत झाला आहे. याची टक्केवारी वजा १२.१८ होते. सध्या उन्हाची तीव्रता जास्त असल्याने जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून मागील २४ तासांत एक दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन नोंदले गेले आहे.
 

Related Articles